नसरापूर घटनेचा फलटणमध्ये कडाडून निषेध; आरोपीला फाशीची मागणी, ‘शक्ती’ कायदा तातडीने लागू करण्याची हाक

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, त्याचे तीव्र पडसाद फलटण शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (नाशिक केंद्र) फलटणच्या वतीने आयोजित या निषेध आंदोलनात संतप्त नागरिकांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. “त्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी, अन्यथा आमच्या ताब्यात द्यावे,” अशा तीव्र भावना व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायव्यवस्थेचा संदर्भ देत, गुन्हेगारांना कठोर आणि त्वरित शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

समाजातील वाढती असंवेदनशीलता चिंताजनक असून अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही मान्यवरांनी सांगितले.तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रस्तावित ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सरकारने या प्रकरणात विशेष लक्ष घालून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, हीच सर्व फलटणकरांची भावना असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

या निषेध सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी काळ्या फिती लावून आणि शांततेत निषेध नोंदवत पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

error: Content is protected !!