महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क, फलटण प्रतिनिधी – फलटण शहरातील एका खासगी दवाखान्यांत रुग्णांची वैद्यकीय तपासणी सुरू होण्यापूर्वीच कंपाऊंडरमार्फत अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डॉक्टरांना दाखविण्याआधीच तपासणीच्या नावाखाली पैसे आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रुग्णांचे म्हणणे आहे की, शहरातील एका प्रसिद्ध दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपाऊंडरकडून नोंदणी किंवा ‘नंबर लावण्याच्या’ नावाखाली रक्कम मागितली जाते. या रकमेची कोणतीही अधिकृत पावती दिली जात नसल्याचेही आरोप आहेत.
आधीच वाढलेल्या औषधोपचार खर्चात ही अतिरिक्त आकारणी म्हणजे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक असल्याची भावना व्यक्त होत आहे.विशेषतः गरीब, ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातून आलेले रुग्ण या प्रकारामुळे अधिक त्रस्त होत आहेत. पैसे न दिल्यास तपासणीस विलंब, नंबर न देणे किंवा दुर्लक्ष केले जाते, असे अनुभव काही रुग्णांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य सेवा व्यवसायिक स्वरूप धारण करत असल्याची टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, संबंधित खासगी दवाखान्यांची तपासणी करून नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दवाखान्यांतील शुल्क फलकावर स्पष्टपणे नमूद करणे व पावती देणे बंधनकारक करावे, अशीही मागणी पुढे आली आहे.
पुढील अनेक महिने तपासणी नंबर आरक्षित असल्याचे कारण रुग्णांना दिले जात असल्याने लवकरात लवकर तपासणी नंबर मिळावा म्हणून काही रुग्णांनी विचारपूस केली असता आतल्या हाताने पैसे देऊन तपासणी नंबर मिळत असल्याची बाब समोर आली. सदर रक्कम नक्की कोणाकडे जाते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आतल्या हाताने दिलेले पैसे कंपाऊंडर पर्यंत राहतात की संबंधित डॉक्टर पर्यंत जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.दरम्यान, आरोग्य विभागाकडून तक्रारींची दखल घेतली जाईल आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
क्रमशः

