खाजगी वाहनांवर अवैध हूटर; फलटण शहरात वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : खाजगी वाहनांना बेकायदेशीररीत्या सायरन, हूटर लावून शहरात सुसाट वेगाने फिरणाऱ्या काही वाहनचालकांविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः गर्दीच्या रस्त्यांवर, शाळा परिसरात आणि प्रमुख चौकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून शहर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

फलटण शहरात गेल्या काही दिवसांपासून काही खाजगी चारचाकी वाहनांवर अवैध सायरन लावून दादागिरीच्या थाटात फिरण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा सुरू आहे. सायरन वाजवत आणि भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या या वाहनांमुळे इतर वाहनचालक आणि पादचारी घाबरून जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

विशेष म्हणजे, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल किंवा अधिकृत शासकीय आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाच सायरन वापरण्याची परवानगी असताना काही खाजगी वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने हूटरचा वापर केला जात आहे. त्यामुळे खऱ्या आपत्कालीन वाहनांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरातील लक्ष्मीनगर चौक, कॉलेज रोड, बारामती रोड, मुख्य बाजारपेठ आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये अशा वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेकदा गर्दी किंवा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले जात असल्याने गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.वाहतूक नियमांनुसार खाजगी वाहनांना सायरन वापरण्यास बंदी आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असतानाही काही जण नियमांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून अशा वाहनांची तपासणी करावी, अवैध सायरन जप्त करावेत आणि संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरात कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा बेकायदेशीर प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत परंतु शहर पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत.

error: Content is protected !!