महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
दिनांक २७ मे २०२६
फलटण : फलटण येथे समर्पित, सहानुभूतीपूर्ण आणि प्रगत ऑर्थोपेडिक सेवा देणारे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लोकमत, पुण्याचे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे फलटणमधील गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या ऑर्थोपेडिक सेवेला राज्यस्तरावर मिळालेली दखल अधोरेखित झाली आहे.
ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी प्रकल्प राबवत असून, संस्थेने भारताचे नॉर्वेमध्ये प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचे सागर अहिवळे आणि आरती भोसले अहिवळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. तसेच सागर अहिवळे आणि आरती भोसले अहिवळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान समाजाच्या उन्नतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

