महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण, दि. ६ : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मेंढ्या घरी घेऊन जात असलेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला एका व्यक्तींनी अडवून मारहाण केली, अश्लील शिवीगाळ केली तसेच हातातील कुऱ्हाड दाखवत “तोडून टाकू, जीवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकाराचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घरी परतत असताना सुरवडी गावाजवळ एका व्यक्तीने त्यांना अडवले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.
महिलांसह कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचा तसेच त्यांच्यावर हात उगारण्यात आल्याचा आरोप आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरडाओरडा, गोंधळ आणि हातात कुऱ्हाड घेऊन धमकावले जात असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता आणि संपूर्ण घटनाक्रमाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या घटनेमुळे मेंढपाळ समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागात मेंढपाळ कुटुंबांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांबाबत प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती आणि घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा संपूर्ण फलटण तालुक्यात सुरू झाली असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

