फलटणजवळ वारकऱ्यांवर कथित हल्ला; दिंडी चालकाला मारहाण व लुटमार, ७० हजारांची लूट झाल्याचा आरोप

गुन्हा नोंद न झाल्याचा वारकऱ्यांचा दावा; पोलीसांनी सुमोटो कारवाई करावी, वारकरी समाजाची मागणी

फलटण | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

दिनांक १० जुलै २०२६

आषाढी वारीनंतर पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर फलटण तालुक्यात कथित हल्ला व लूटमार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेत दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना मारहाण होऊन त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा दावा वारकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलैच्या मध्यरात्री पुणे–पंढरपूर महामार्गावरील वडजलजवळील काशीदवाडी फाट्याजवळ दिंडी विश्रांती व जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक करत दिंडीवर हल्ला केला. दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडील सुमारे ७० हजार रुपयांची रोकड घेऊन हल्लेखोर पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले होते. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, “इथून निघून जा, गाडीची हवा सोडली असती तर काय झाले असते,” अशा स्वरूपाचे वक्तव्य करून पोलीसांनी दडपण आणल्याचाही आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

मारहाणीत जखमी झाल्यानंतरही त्रिंबक कोळेकर यांनी वारीचा प्रवास सुरू ठेवला. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वारकरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या घटनेची अधिकृत तक्रार भीतीपोटी दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना तातडीने अटक करावी आणि भविष्यात वारकरी दिंड्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी

“आम्ही विठुरायाच्या नामस्मरणात वारी करत होतो. कोणाशीही वैर नव्हते. पण आमच्यावर अचानक हल्ला झाला. माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आमच्याकडील पैसेही घेऊन गेले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढे यावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी.”

– त्रिंबक कोळेकर, दिंडी चालक, वडवणी (जि. बीड)

पोलीसांच्या भूमिकेची चौकशी करून कारवाईची मागणी

वारकऱ्यांवर कथित हल्ला, मारहाण व लूट झाल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तसेच गुन्हा नोंदविण्याऐवजी दिंडीतील वारकऱ्यांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, कर्तव्यात कसूर प्रकरणी त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी वारकरी, सामाजिक संघटना व नागरिकांकडून होत आहे.

वारकरी निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून या प्रकरणी माहिती घेतली असता या प्रकरणी डायल ११२ वरती आलेल्या कॉल नुसार ग्रामीण व शहर दोन्ही पोलीस घटनास्थळी पोहचले होते परंतु संबंधित वारकऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला नाही व ते त्या ठिकाणाहून पुढे निघून गेले, याबाबत तक्रार आल्यास गुन्हा दाखल करून घेतला जाईल अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली.

error: Content is protected !!