महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण, प्रतिनिधी : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी भारतीय स्टेट बँक, फलटण शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप, फलटण शेती शाखेचे शाखाधिकारी योगेश कोरडे, वरिष्ठ लिपिक विष्णुपंत जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील विशाल मंडले, आदित्य चौगुले, सोनाली भोसले, शौर्य सावंत, सुयश जाधव, श्री अवघडे, आयात सय्यद, वैष्णवी चांडाळ पवार, अंजली डोंगरे, दुर्गेश्वरी पवार, कुणाल आवारे, सुशांत पवार, तृप्ती भालेराव तसेच इयत्ता सहावीतील श्रद्धा भोसले या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना शाखाधिकारी चंद्रकांत जगताप आणि योगेश कोरडे यांनी भारतीय स्टेट बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित बचतीची सवय लावावी, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे तसेच प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आज मिळालेला गणवेश विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया अधिक भक्कम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्टेट बँकेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर पवार यांनी केले.

