महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | ७ जुलै २०२६
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय आता सभासदांनीच घ्यावा. जर सभासदांनी ठाम भूमिका घेतली नाही, तर “मी या भानगडीत पडणार नाही,” असा स्पष्ट इशारा देतानाच, कारखान्याच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती यांनी जाहीर केले.
फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची तातडीची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले की, श्रीराम कारखाना केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे, तर श्रीमंत मालोजीराजे यांच्या स्वप्नातील सहकारी संस्था म्हणून जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. “स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तुमच्या कुटुंबासाठी आयुष्य घालवले. आता कारखान्याच्या भवितव्याचा अंतिम निर्णय सभासदांनी घ्यायचा आहे,” असे ते म्हणाले.
कारखान्याला आर्थिक बळ देण्यासाठी प्रत्येक सभासदाने पुढील आठ दिवसांत १५ हजार रुपये भरून शेअर्स पूर्ण करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे १२ कोटी रुपयांचे भागभांडवल जमा झाल्यास बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतरही अडथळे निर्माण झाल्यास सर्वांनी रस्त्यावर उतरावे, त्याचे नेतृत्व मी स्वतः करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रामराजे यांनी पराभवाबद्दल खंत व्यक्त केली.
“आमच्या तीन पिढ्यांनी जनतेची सेवा केली. धरणे उभारली, उद्योग आणले, कारखाना वाचवला; मात्र त्याचे राजकीय फळ मिळाले नाही. विरोधकांनी सत्तेच्या बळावर आमदारकी आणि नगरपालिका मिळवली असून आता श्रीराम कारखान्यावरही डोळा आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, गरीब सभासदांच्या संसाराचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका करत, कारखान्याच्या पुनरुज्जीवनात राजकीय अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. “हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. श्रीराम कारखान्याचे धुराडे पुन्हा पेटणे ही तालुक्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत, शेतकऱ्यांना योग्य ऊसदर आणि कामगारांना वेळेवर वेतन मिळावे या उद्देशाने कारखाना चालविण्यात आला असल्याचे सांगितले.
राजकीय दबावामुळे कारखाना अडचणीत आल्याचा आरोप करत, सभासदांनी मतभेद विसरून एकत्र येत संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीच्या प्रारंभी संचालक संतोष खटके यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्यावरील न्यायालयीन प्रकरणे, प्रशासकीय पत्रव्यवहार आणि सध्याची स्थिती सभासदांसमोर सविस्तर मांडली.

