फलटण नगरपरिषदेच्या कर वसुली विभागात ₹२० हजारांचा अपहार ? न्याय न मिळाल्यास २१ जुलैला आत्मदहनाचा अय्याज कोतवाल यांचा इशारा!

कर भरलेल्या चेकची रक्कम दुसऱ्याच मालमत्तेवर जमा केल्याचा आरोप; दोषींवर कारवाईची मागणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

१४ जुलै २०२६

फलटण नगरपरिषदेतील कथित कर घोटाळ्याचे पडसाद जोरदार उमटत आहेत कर वसुली विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फलटण येथील नागरिक अय्याज इक्बाल कोतवाल यांनी आपल्या मालमत्ता करापोटी भरलेल्या ₹२०,००० च्या धनादेशाची (चेकची) रक्कम चुकीच्या मालमत्तेवर जमा करून आर्थिक अपहार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी दि. २१ जुलै २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

अय्याज कोतवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दि. २३ मार्च २०२४ रोजी त्यांच्या मालमत्ता क्रमांक W3BZ3000596 आणि W3BZ3000597 यांच्या करापोटी ₹२०,००० चा चेक नगरपरिषदेकडे जमा केला होता. मात्र, संबंधित रक्कम त्यांच्या मालमत्तेवर जमा न करता मालमत्ता क्रमांक W3BZ3000504 या दुसऱ्याच मालमत्तेवर दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा करत, हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून आर्थिक अपहाराचा गंभीर प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.कोतवाल यांनी आपल्या निवेदनात आठ दिवसांच्या आत संबंधित रक्कम त्यांच्या मूळ मालमत्ता खात्यावर जमा करून अधिकृत पावती द्यावी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच, दि. २१ जुलैपर्यंत न्याय न मिळाल्यास मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आत्मदहन झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच, त्यानंतर संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती स्थानिक पोलीस प्रशासनासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या असून, आत्मदहनाचा इशारा लक्षात घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.फलटण नगरपरिषदेतील कथित कर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या नव्या आरोपांमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि तक्रारदाराला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!