महाराष्ट्राच्या ज्युनियर हॉकी संघात फलटणच्या चार महिला खेळाडूंची निवड

कु. निकिता वेताळ, कु. अनुष्का केंजळे, कु. अनुष्का चव्हाण व कु. शिफा मुलानी यांची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी

हॉकी महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने हॉकी इंडिया अंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्राच्या ज्युनियर महिला हॉकी संघासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत दि हॉकी सातारा संघटनेच्या चार महिला खेळाडूंची महाराष्ट्राच्या ज्युनियर हॉकी संघात निवड झाली आहे.

या निवड चाचणीमध्ये दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. समृद्धी बनकर, कु. श्रद्धा यादव, कु. सिद्धी केंजळे, कु. आरोही पाटील, कु. मानसी पवार, कु. गायत्री खरात, कु. तेजस्विनी कर्वे, कु. ऋतिका घाडगे, कु. निकिता वेताळ, कु. अनुष्का केंजळे, कु. अनुष्का चव्हाण आणि कु. शिफा मुलानी या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

निवड चाचणीदरम्यान कु. निकिता वेताळ, कु. अनुष्का केंजळे, कु. अनुष्का चव्हाण आणि कु. शिफा मुलानी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्राच्या ज्युनियर महिला हॉकी संघात आपले स्थान निश्चित केले.

महाराष्ट्राच्या या संघाची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दि. १७ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी फलटणच्या या चार खेळाडूंना मिळाली आहे.

निवड झालेल्या सर्व महिला हॉकी खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे तसेच एन.आय.एस. हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणासाठी बी. बी. खुरंगे हे सहाय्य करीत आहेत.

ही संपूर्ण निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्र संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे व सागर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा तसेच पदाधिकारी पंकज पवार, प्रवीण गाडे, महेंद्र जाधव, सचिन लाळगे आणि माजी राष्ट्रीय खेळाडू सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

फलटणच्या या चारही खेळाडूंच्या निवडीमुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या यशामुळे आगामी काळात आणखी युवा खेळाडूंना हॉकीकडे आकर्षित होण्यास प्रेरणा मिळणार आहे.

error: Content is protected !!