महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून, जादूटोण्याच्या नावाखाली तिच्यावर कथित विधी केल्यानंतर तिला शाळेतून दुचाकीवरून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयित सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह फलटण शहरात राहत असून संशयित मदने याचे कुटुंब त्यांच्या घरासमोर राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून कौटुंबिक संबंध होते. एकमेकांच्या घरी ये-जा असल्याने संशयिताची मुलीशीही ओळख होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२५ पासून संशयिताने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिला आपण आवडत असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.यानंतर संशयिताने मुलीला तिच्या अंगात भूत शिरल्याचे घरच्यांना सांगण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मुलीने त्यानुसार आईला सांगितल्यानंतर संशयिताने जादूटोण्यावर उपाय करण्याच्या नावाखाली तिच्या कुटुंबीयांसमक्ष कथित विधी केल्याचा आरोप आहे. या प्रकारात मुलीच्या गळ्यात चामडीची वस्तू घालणे, बाहुलीवर कथित विधी करणे आणि त्यानंतर तिच्या अंगातून भूत निघून गेल्याचे सांगणे, अशा प्रकारचा प्रकार झाल्याचे तिच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी मुलीची आई आजारी असल्याने रुग्णालयात दाखल असताना संशयिताने मुलीला आपल्या घरी बोलावून काळुबाई मांढरदेवी येथे देवदर्शनासाठी जाण्याचे सांगितले. मुलीने होकार दिल्यानंतर संशयित तिला दुचाकीवरून मांढरदेवी येथे घेऊन गेला आणि दर्शनानंतर दोघे फलटणला परत आले. ही बाब त्याच दिवशी आई-वडिलांना सांगितली नसल्याचे मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
यानंतर १६ जुलैच्या दोन-तीन दिवसांनी संशयिताने मुलीला तिच्या शाळेजवळ गाठून आपण निरगुडी येथील जुन्या घरी जाऊ, आज शाळेत जाऊ नकोस, असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला दुचाकीवरून निरगुडी येथील जुन्या घरी नेण्यात आले. तेथे कोणी नसल्याचा गैरफायदा घेत संशयिताने मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्यावर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.
त्यानंतर संशयिताने तिला पुन्हा शाळेच्या गेटजवळ आणून सोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.ऑगस्ट २०२६ मध्येही संशयिताने मुलीला शाळेजवळून दुचाकीवरून निरगुडी येथील जुन्या घरी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर फलटण शहरातील संशयिताच्या घरीही वेळोवेळी बोलावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुलीने सांगितल्याचे पोलिस जबाबात नमूद आहे.
गणपती उत्सवाच्या काळात मुलगी आपल्या आजीकडे गेल्यानंतरही संशयिताने आजीच्या मोबाईलवर फोन व संदेश करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.दरम्यान, संशयिताशी आपला संपर्क असल्याची माहिती आई-वडिलांना मिळाल्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. अखेर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती घरातून कोणालाही न सांगता सरकारी बसने निघून गेली. प्रवासादरम्यान एका अनोळखी व्यक्तीने ती एकटी असल्याचे पाहून चौकशी केली.
मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघाल्याचे समजल्यानंतर त्या व्यक्तीने तिला जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिची माहिती घेऊन कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तिचे आई-वडील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले.कुटुंबीयांनी मुलीशी चर्चा केल्यानंतर तिने संशयिताकडून आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर मुलगी आई-वडिलांसोबत फलटण शहर पोलीस ठाण्यात आली आणि संशयिताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासामध्ये पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी, शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश, संबंधित ठिकाणांवरील पुरावे आणि अन्य साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.
अल्पवयीन मुलीने केलेले आरोप गंभीर असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी होत आहे. दरम्यानच्या कालावधीत “आमचे सौरभ गुरु वरचे केस मागे घ्या नाहीतर येत्या अमावश्याचे आत सर्व कुटुंब संपवणार” अशी धमकीचे पत्र पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर पत्रामध्ये लिंबू ठेवून झाडाच्या कुंडीत ठेवण्यात आले आहे.
या घटनेमुळे संबंधित मुलीचे कुटुंबीय भीतीच्या छायेत असून या एकंदरीत सर्व घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

