जिंतीतील कोळपेवस्ती येथील बिरोबा मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; फलटण ग्रामीण पोलिसांकडून आरोपी जेरबंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी: तालुक्यातील मौजे जिंती येथील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत हरिष विठ्ठल कोळपे (रा. कोळपेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मौजे जिंती गावच्या हद्दीतील बिरोबा मंदिरातून पितळी समई, पितळी घंटा व इतर साहित्य असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार करण्यात आली होती. ही चोरी दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पिसे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान संशयित आरोपी जय संजय वेदपाठक (वय २२, रा. पिंपळवाडी, ता. फलटण) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १२.२० वाजता अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत पोलीस हवालदार पिसे, पोलीस हवालदार अडसूळ, पोलीस हवालदार पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पिसे करीत आहेत.

error: Content is protected !!