फलटणमध्ये रोडलाईटच्या स्मार्ट मीटरचा तांत्रिक अडथळा; दिवसा वीजपुरवठ्यासाठी नगरपरिषदेचे महावितरणला पत्र

लाईन फॉल्ट शोधण्यात अडचणी; रोडलाईट दुरुस्तीला विलंब होत असल्याने तसेच रोड लाईट उशिरा सुरू होणे लवकर बंद होणे याबाबत तांत्रिक व्यवस्था करण्याची नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी :फलटण नगरपरिषद हद्दीतील विविध ठिकाणी रोडलाईटसाठी बसविण्यात आलेल्या स्वयंचलित स्मार्ट मीटरमुळे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याची तांत्रिक अडचण समोर आली आहे. त्यामुळे रोडलाईटच्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास त्याचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी निर्माण होत असून, दुरुस्तीच्या कामालाही विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फलटण नगरपरिषदेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांना पत्र पाठवून आवश्यक तांत्रिक व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या संदर्भासह कार्यकारी अभियंता, महावितरण, विभागीय कार्यालय, फलटण यांना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी हे पत्र पाठविण्यात आले आहे. यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२६ रोजीही यासंदर्भात पत्र देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नगर परिषद येथे याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

स्मार्ट मीटरमुळे ठरावीक वेळेतच रोडलाईट सुरू

नगर परिषद हद्दीतील विविध ठिकाणच्या रोडलाईट विद्युत जोडण्यांसाठी महावितरणमार्फत स्वयंचलित स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरच्या निर्धारित वेळेनुसार सायंकाळी ७.१५ वाजता रोडलाईट सुरू होतात आणि सकाळी ७ वाजता बंद होतात.मात्र, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्याने रोडलाईट सुरू होण्याच्या वेळेत बदल करण्याची गरज असल्याचे नगरपरिषदेने पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार सायंकाळी ६.१० ते ६.१५ या वेळेपासून रोडलाईट सुरू करण्याची तसेच सकाळी ६.१५ वाजता बंद करण्याची वेळ निश्चित करण्याची मागणी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून पत्रात करण्यात आली आहे.

लाईन फॉल्ट शोधताना अडचणी

रोडलाईटच्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड अर्थात लाईन फॉल्ट झाल्यास त्याचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी दिवसा रोडलाईट सुरू करून संपूर्ण वाहिनीची तपासणी करणे आवश्यक असते. मात्र, स्वयंचलित स्मार्ट मीटरमधून दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने रोडलाईट सुरू करून तपासणी करणे शक्य होत नसल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.यामुळे विद्युत वाहिनीतील बिघाडाचे नेमके ठिकाण आणि त्यामागील कारण शोधताना अडचणी येतात. परिणामी, अंदाजाच्या आधारे दुरुस्ती करावी लागत असून, बिघाड वेळेत आणि अचूकपणे दूर करण्याच्या कामावर परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

रोडलाईट बंद राहिल्यास सुरक्षेचा प्रश्न

शहरातील रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी रोडलाईट बंद असल्यास नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू शकतो. तसेच, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाबही नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिली आहे.रोडलाईटच्या दुरुस्तीला विलंब झाल्यामुळे नागरिकांकडून नगरपरिषदेच्या विद्युत विभागाविषयी नाराजी व्यक्त केली जात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिवसा आवश्यकतेनुसार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी

या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी स्वयंचलित स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या रोडलाईट विद्युत जोडण्यांना दिवसा आवश्यकतेनुसार वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी योग्य तांत्रिक व्यवस्था करण्याची मागणी नगरपरिषदेने केली आहे.याबाबत महावितरणने आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती फलटण नगरपरिषदेला कळवावी, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती अतिरिक्त कार्यकारी अभियंता तसेच महावितरणच्या फलटण शहर कार्यालयातील भाग १ आणि भाग २ च्या शाखा अभियंत्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!