महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | २६ मे २०२६ : राज्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने गोकुळ दुग्ध प्रकल्प येथे गोविंद मिल्क चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गोकुळ दूध संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. योगेश गोडबोले यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती देत सध्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
गोधन संवर्धन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, आधुनिक दुग्ध प्रक्रिया, पशुखाद्य व्यवस्थापन, तांत्रिक सुविधा तसेच दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.गोकुळ दुग्ध प्रकल्प च्या कार्यपद्धतीबरोबरच भविष्यातील विस्तार योजना, शेतकरी केंद्रित उपक्रम आणि दुग्ध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावरही सखोल चर्चा झाली.
या भेटीदरम्यान गोकुळ दूध संघ प्राधिकृत अधिकारी समिती अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, प्रदीप मालगावे तसेच प्रकल्पातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रकल्पातील विविध विभागांची पाहणी करून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यपद्धतीची माहिती घेतली.
दुग्ध व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकल्पांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी गोकुळ दुग्ध प्रकल्प च्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य हेही उपस्थित होते.या सदिच्छा भेटीमुळे फलटण व कोल्हापूरच्या दुग्ध क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

