फलटण नगरपरिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी रखडली; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा अनुप शहा यांचा इशारा

सहा महिने उलटूनही ठरावाची अंमलबजावणी नाही; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या दिनांक २५ मार्च २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक २५ व ठराव क्रमांक २५ ची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत दिनांक २६ जून २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊनही कार्यवाही न झाल्याने अनुप शहा यांनी आता सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित विषयावर ठराव मंजूर होऊन जवळपास सहा महिने उलटले आहेत. सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावाची प्रशासनाकडून वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे अनुप शहा यांचे म्हणणे आहे.दरम्यान, ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांशी असलेल्या कथित संबंधांमुळे ठरावाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रखडविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अनुप शहा यांच्याकडून करण्यात आला आहे.

ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत २६ जून रोजी मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संबंधितांनी नाराजी व्यक्त केली आहे.नगरपरिषदेच्या सभागृहात मंजूर झालेला ठराव प्रशासनाकडून प्रलंबित का ठेवण्यात आला? ठरावाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या प्रशासकीय अडचणी आहेत? तसेच या प्रकरणात कोणाचा आर्थिक अथवा वैयक्तिक हितसंबंध आहे का? याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.तसेच या प्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागून सुद्धा जाणीवपूर्वक माहिती देण्यात आलेली नाही असे अनुप शहा यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडून ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने नाईलाजास्तव सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अनुप शहा सांगितले आहे.या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावाची अंमलबजावणी का रखडली, याबाबत चौकशी होते का, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!