महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण : फलटण नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत २ डिसेंबर रोजी होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत काल रात्री उशिरा अधिकृत आदेश जारी केला आहे.
नगर परिषद निवडणूक अनुषंगाने जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रिया बाबत याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळं जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी घेतला गेला यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबीवर पडण्यामागचे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे. ४ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक जारी करण्याची तारीख देण्यात आली असून जिल्हाधिकारी याबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांक १० डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार आहे. चिन्ह नेमून देण्यासाठी आणि अंतिम रित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक ११ डिसेंबर २०२५ असणार आहे. मतदान प्रक्रिया २० डिसेंबर २०२५ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे. मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. फलटण नगरपरिषदेची निवडणुक १५ ते २० दिवस पुढे जाणार असल्याची व याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत आदेश पारित होण्याची शक्यता कालच “महाराष्ट्र माझा” कडून वर्तवण्यात आली होती.
याबाबत चर्चा फलटण तालुक्यात काल दुपार पासून सुरू असल्याने नगरपरिषद निवडणूक करता उभे असणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली गेली आहे.फलटण नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. याबाबत निवडणूक उभे असणाऱ्या सर्व पक्षांकडून प्रचार यंत्रणा जोरदार सुरू होत सर्व निवडणुकीला उभे असणारे उमेदवार प्रचारात व्यस्त असून नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणे, कोपरासभा घेणे यामध्ये व्यस्त होते.
अशातच काल दुपारी अचानक फलटण नगरपरिषदेची निवडणुक १५ ते २० दिवस पुढे जाणार असल्याची व याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत आदेश पारित होण्याची शक्यता असल्याची चर्चा फलटण तालुक्यात काल दुपार पासून सुरू झाली.तीन दिवसांवर आलेली निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन तांत्रिक कारण असल्याची चर्चा फलटण तालुक्यात जोरदार सुरू होती.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज संबंधी जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या याचिकेचा निकाल २५ नोव्हेंबर २०२५ अखेर देणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने याचा निकाल देण्यासाठी वेळ लागला असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा न्यायालयात फलटण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या व एका नगरसेवक पदाच्या उमेदवाराची याचिका फेटाळण्यात आली असून दिनांक १ डिसेंबर २५ पर्यंत उच्च न्यायालयात याबाबत अपील करण्याची अवधी असल्याने दिनांक १ डिसेंबर २५ रोजी फलटण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची याचिका दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर फलटण शहरात प्रचार यंत्रणा काही प्रमाणात थंडावल्या आहेत.एकंदरीतच निवडणूक प्रक्रिया ही २० दिवस पुढे गेल्याने याचा फायदा कोणाला बसणार याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने या प्रक्रियेचा फायदा कोणत्या पक्षास मिळणार तर फटका कोणत्या पक्षास मिळणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

