महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
राज्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. मतमोजणी प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ४ डिसेंबरला सर्वाेच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणी आज ५ डिसेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे. आज होणाऱ्या याचिकेच्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबरला दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले.
या ठिकाणी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील काही नगरपालिका व नगर पंचायतची निवडणूक प्रक्रिया आयोगाने पुढे ढकलली होती. ही निवडणूक २० डिसेंबरला होणार असल्याने सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २० तारखेला मतदान होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या आदेशाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ४ डिसेंबरला स्वीकारली असून आज दिनांक ५ डिसेंबरला यावर सुनावणी होणार आहे.

