महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण: राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक व वक्फ, क्रीडा व मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे.
सोमवार 2 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार या कराड आणि फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे जातील. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.
दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फलटणला रवाना होतील. फलटणमध्ये तरडगाव येथे सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील आणि त्यांच्या दु:खात सहभागी होतील, यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीला रवाना होतील.
28 जानेवारीला बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं, ज्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये अजित पवारांसोबत असलेले पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील तरडगावचे रहिवासी आहेत.
सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटंबाचं सांत्वन करणार आहेत. 7 वर्षांपासून विदीप जाधव हे अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले तेव्हाही विदीप जाधव त्यांच्यासोबत विमानात होते.

