महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव
श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत विविध विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, त्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.
बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त २३ तारखेला श्रींचा नैवेद्य तर २४ तारखेला पालखी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री नाईकबा मंदिर परिसरात यात्रेच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी सोपान टोंपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीस तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिरीश सावंत, बनपुरीचे सरपंच मनोज पाटील, जानुगडेवाडीचे उपसरपंच सचिन जानुगडे, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव जानुगडे, अॅड. अविनाश जानुगडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, यात्रा समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, तसेच धीरज पाटील, विक्रम जगदाळे, संतोष भालेकर, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार, संग्राम जानुगडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच आरोग्य, पाणीपुरवठा, वन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन केले. धोकादायक वीजवाहिन्या व केबल यांचा सर्व्हे करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच आरटीओ व पोलिस विभागाने समन्वय साधून वाहतूक नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली. यात्रेदरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणे, पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था करणे आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे यावरही भर देण्यात आला.
तसेच पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणे, आरोग्य विभागाने औषधसाठ्यासह पथके सज्ज ठेवणे, बेकायदा दारूविक्रीवर तात्काळ कारवाई करणे, स्वयंसेवकांची टीम तयार करणे, बस वाहतुकीचे नियोजन करणे आणि मंदिर परिसरात सर्व विभागांची कंट्रोल रूम उभारणे याबाबत सूचना करण्यात आल्या.गर्दीत बैलांना आणू नये यासाठी काळजी घेणे, दुकाने व यात्रा परिसरात अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे, तसेच आवश्यक ठिकाणी अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध ठेवणे आणि महिंद धरणातून योग्य वेळी पाणी सोडण्याची व्यवस्था करणे अशा सूचना देखील देण्यात आल्या.
सरपंच मनोज पाटील यांनी ग्रामपंचायत व महेश पाटील कंपनीतर्फे करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली, तर ट्रस्टमार्फत करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती अॅड. अविनाश जानुगडे यांनी दिली.यावेळी प्रांताधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले की, “बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांची व जबाबदाऱ्यांची संबंधितांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. यात्रेपूर्वी होणाऱ्या पुढील बैठकीत त्याचा आढावा घेतला जाईल. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक माहिती व अत्यावश्यक मोबाईल क्रमांक असलेली डायरी तयार करून यात्रेकरूंना उपलब्ध करून द्यावी.”

