ढेबेवाडीसह परिसरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट; तरुण पिढी विनाशाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क – ढेबेवाडी प्रतिनिधी :सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले पाटण तालुक्यातील शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे ढेबेवाडी गाव सध्या अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेच्या छायेत आले आहे. परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, अनेक कुटुंबांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ढेबेवाडीसह आसपासच्या भागात गांजा सहज उपलब्ध होत असून, शासनाने बंदी घातलेले असतानाही छुप्या मार्गाने त्याची विक्री सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः कॉलेज परिसर, बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी काही तरुण दिवसाढवळ्या नशेत वावरताना दिसत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या या व्यसनाधीनतेमुळे शैक्षणिक वातावरणही बिघडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. नशेत असलेल्या तरुणांमध्ये वारंवार वादावादी आणि भांडणे होत असल्याने परिसरातील शांतता धोक्यात आली आहे.या प्रकाराचा सर्वाधिक परिणाम महिला आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर होत असल्याचेही बोलले जात आहे.

बस स्थानक परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी नशेत फिरणाऱ्या तरुणांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कॉलेज सुटण्याच्या वेळेत मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून, पालक आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत.दरम्यान, या वाढत्या प्रकारांकडे स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

“अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जात आहे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.आंदोलनाचा इशाराया पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कॉलेज परिसर, बस स्थानक आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची नियमित गस्त वाढवून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

“ढेबेवाडी आणि परिसरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. विशेषतः कॉलेज सुटण्याच्या वेळी आणि बस स्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी. जर प्रशासनाने या गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही, तर अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्रशासनाने आता तरी डोळे उघडावेत, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल. वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही दाद मागू.”— नितीन पाटील, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, पाटण तालुका.

error: Content is protected !!