सावकारीचा तगादा व आर्थिक छळाला कंटाळून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासो खोपडे (वय ४२) यांनी सावकारीचा तगादा, आर्थिक फसवणूक तसेच फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र खोपडे यांनी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले.

या प्रकरणी त्यांच्या पत्नी कोमल रवींद्र खोपडे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुरज कदम, दिगंबर भिवरकर, प्रितेश चोपडा, कृष्णा उर्फ रमेशचंद्र केशवदेव गुप्ता, तसेच चोलामंडलम फायनान्सचे व्यवस्थापक कोरडे आणि आयडीएफसी बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील बालगुडे यांचा समावेश आहे.फिर्यादीनुसार, खोपडे यांनी सुरज कदम याच्याकडून घेतलेल्या कर्जाची मोठी रक्कम परत करूनही त्यांच्याकडून अधिक पैशांसाठी सातत्याने तगादा लावण्यात येत होता.

तसेच एका कंटेनरचा ताबा बेकायदेशीररीत्या घेण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय, दिगंबर भिवरकर व प्रितेश चोपडा यांनी दोन वाहनांच्या खरेदीत फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. कृष्णा गुप्ता यानेही वाहन खरेदी करून संपूर्ण रक्कम अदा केली नसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.तसेच फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाहने उभी करून मानसिक छळ केला, तर बँक अधिकाऱ्यांनी नातेवाईक व शेजाऱ्यांना फोन करून शिवीगाळ करत बदनामी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे, खोपडे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या दोन चिठ्ठ्यांमध्ये संबंधित संशयितांची नावे व त्यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला असून त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बेकायदेशीर सावकारीचे आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.

error: Content is protected !!