भारताची जनगणना २०२७ : स्वयं-जनगणना व डिजिटल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी- संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच स्वयं-जनगणना (Self Enumeration) आणि डिजिटल जनगणना ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी फलटण तालुक्यात प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाची जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मे-जून २०२६ दरम्यान घरगणना व संसाधन गणना केली जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी नागरिकांची सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याविषयक सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संतोष पाटील आणि उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरता येणार आहे.

या डिजिटल प्रक्रियेमुळे नागरिकांचा तसेच प्रगणकांचा वेळ वाचणार असून माहिती अधिक अचूकपणे नोंदवली जाणार आहे.नोंदणी प्रक्रियेत प्रथम संकेतस्थळावर प्रवेश करून राज्य निवडावे लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल नमूद करून नोंदणी पूर्ण करावी लागेल. मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीद्वारे पडताळणी केल्यानंतर भाषा निवडून जिल्हा, पिनकोड, गाव किंवा परिसराची माहिती भरावी लागेल.

तसेच नकाशावर स्वतःचे अचूक निवासस्थान निश्चित करणे आवश्यक राहील.यानंतर घर व कुटुंबाशी संबंधित एकूण ३३ प्रश्नांची सविस्तर माहिती भरून अंतिम सादरीकरण करावे लागेल. एकदा माहिती सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सादरीकरणापूर्वी माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

माहिती सादर केल्यानंतर नागरिकांना स्वयं-जनगणना ओळख क्रमांक (SE ID) दिला जाणार आहे. दि. १६ मे ते १५ जून दरम्यान प्रगणकांच्या घरभेटीवेळी हा आयडी दाखवणे आवश्यक राहणार आहे.फलटण तालुक्यात जनगणना प्रभावीपणे राबविण्यासाठी ४७१ घरयादी प्रगणक गट, ४६८ प्रगणक, ४७ राखीव प्रगणक, ५८ पर्यवेक्षक, ६ राखीव पर्यवेक्षक आणि ८ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय फलटण येथे विविध टप्प्यांत आयोजित करण्यात आले असून २४ ते २६ एप्रिल, २७ ते २९ एप्रिल आणि २ ते ४ मे २०२६ या कालावधीत प्रशिक्षण सत्रे पार पडत आहेत. या प्रशिक्षणात ऑनलाइन प्रणालीचा वापर, माहिती संकलन पद्धती आणि नागरिकांशी संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन दिले जात आहे.

यंदा प्रगणकांकडून माहिती संकलनासाठी मोबाईल अॅपचा वापर केला जाणार आहे. जनगणना कायदा कलम १५ नुसार नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध होणार नाही किंवा न्यायालयीन पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

स्वयं-जनगणना ही प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी असल्याने फलटण तालुक्यातील नागरिकांनी १ ते १५ मे दरम्यान स्वतःहून माहिती भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!