वाई-पाचगणी घाटात दरड कोसळली; स्थानिकांनी सुरळीत केली वाहतूक, प्रशासनाचा पत्ता नाही!

मुसळधार पावसामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर संताप

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

अजय संकपाळ, ब्युरो चीफ सातारा

वाई, दि. ३ : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाई-पाचगणी घाटात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे बुवासाहेब मंदिराजवळ मोठी दरड कोसळून दगड, माती आणि मुरूम थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरड कोसळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड आणि माती हटविण्याचे काम सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि संथ गतीने वाहतूक सुरू झाली.धक्कादायक बाब म्हणजे घटना घडून बराच वेळ उलटल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता.

पावसाळ्यात दरडप्रवण घाटरस्त्यांवर आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे अपेक्षित असताना प्रशासनाची ही उदासीनता गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.वाई-पाचगणी घाट हा दररोज हजारो पर्यटक, नागरिक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. अशा संवेदनशील घाटात दरड कोसळल्यानंतरही तातडीची यंत्रणा कार्यरत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सध्या घाट परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुके कायम असून डोंगरावरून आणखी दगड कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जेसीबी, आपत्कालीन पथके आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करून संपूर्ण घाटाची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्न अनुत्तरितच…

– दरडप्रवण घाटांची पूर्वतयारी नेमकी कुठे?

– सार्वजनिक बांधकाम विभागाची आपत्कालीन यंत्रणा निष्क्रिय का?

– स्थानिक नागरिकांनीच रस्ता मोकळा करायचा, मग प्रशासनाची जबाबदारी कोणाची?

– मोठी जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण?

error: Content is protected !!