फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ; अरविंद काळे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. २ जुलै : सातारा जिल्हा पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार एकूण ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या फेरबदलात फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी घनश्याम बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून, फलटण शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता नूतन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर असणार आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.दरम्यान, फलटण शहर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची बदली सायबर पोलीस ठाणे, सातारा येथे करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे.या व्यापक बदल्यांमुळे सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळणार असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बदली आदेशात सर्व ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही विलंब न करता तातडीने आपल्या नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याचा अहवाल त्वरित जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!