फलटणच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय; डेक्कन चौक–उमाजीराजे नाईक चौक मार्गाला ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ नाव

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. ३ जुलै : फलटण शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाला जपणारा महत्त्वपूर्ण निर्णय फलटण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. डेक्कन चौक ते उमाजीराजे नाईक चौक या प्रमुख मार्गाला आता ‘प.पू. उपळेकर महाराज पथ’ असे अधिकृत नाव देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे शहराच्या आध्यात्मिक परंपरेला अधिकृत स्वरूपात गौरव मिळाला आहे.या मार्गाला संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांचे नाव देण्याबाबत विजय उपळेकर यांनी नगरपरिषदेकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने त्यास मंजुरी दिली.

संत प.पू. गोविंदकाका महाराज उपळेकर यांनी फलटणच्या आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असतानाच त्यांनी अध्यात्माच्या माध्यमातून अनेक भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हा नामकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे सभेत नमूद करण्यात आले.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, फलटणला समृद्ध आध्यात्मिक वारसा लाभला असून संत उपळेकर महाराजांचे योगदान शहरासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने प्रमुख रस्त्याचे नामकरण केल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांनाही त्यांच्या कार्याची माहिती मिळेल आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचेल.

नगरपरिषदेच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!