महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण, दि. ३ जुलै : गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूमिपुत्र, प्रगतशील, प्रयोगशील तसेच सेंद्रिय व जैविक नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते शेतकरी अनिल बुवासाहेब कदम यांचा कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित बाजरी पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि फलटण पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कृषी दिन कार्यक्रमात हा सत्कार पार पडला.फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, गटविकास अधिकारी अक्षय गव्हाटे, कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि उपविभागीय कृषी अधिकारी खलीद मोमीन यांच्या हस्ते अनिल कदम यांना सन्मानपत्र आणि जांभूळाचे रोप देऊन गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना अनिल कदम यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी फलटण तालुक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र व हवामान केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना दैनंदिन बाजारभावांची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी फलटण पंचायत समिती येथे डिजिटल बाजारभाव फलक उभारण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
यावर सभापती शिवांजली भोसले यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र तसेच डिजिटल बाजारभाव फलकाच्या प्रस्तावांबाबत फलटण पंचायत समिती आगामी काळात पुढाकार घेऊन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी नेवसे यांनी केले.

