फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाणीचा प्रयत्न; सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांना शस्त्र परवान्यासाठी आवश्यक असलेल्या ‘फिट फॉर’ वैद्यकीय प्रमाणपत्रावरून दमदाटी, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

या प्रकरणी डॉ. रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी देणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.फिर्यादीनुसार, डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर (रा. फडतरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे गेल्या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

दि. 28 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून दि. 29 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांची 24 तासांची ड्युटी होती.सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख (रा. जावली, जि. सातारा), परदेशी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) तसेच त्यांच्यासोबत आणखी तीन जण उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी शस्त्र परवाना (आर्म्स लायसन्स) मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ‘फिट फॉर’ वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यानुसार डॉ. रुपनवर यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून रक्तदाब (बी.पी.) आणि ईसीजी तपासणी करण्यास सांगितले.

तपासणीनंतर संबंधित पुन्हा डॉक्टरांकडे आले. त्यावेळी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने बाहेरील मानसोपचार तज्ज्ञांचे मत घेऊन येण्याच्या सूचना डॉ. रुपनवर यांनी दिल्या. संबंधितांनी खाजगी मानसोपचार तज्ज्ञांकडून मत घेऊन सायंकाळी सुमारे 7 वाजता पुन्हा रुग्णालयात हजेरी लावली.त्यावेळी ओपीडीची वेळ संपून आपत्कालीन (इमर्जन्सी) सेवा सुरू झालेली असल्याने डॉ. रुपनवर यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ओपीडी सुरू झाल्यानंतर येण्यास सांगितले.

मात्र, संबंधितांनी “फक्त सही आणि शिक्का द्यायचा आहे, आत्ताच प्रमाणपत्र द्या,” असा आग्रह धरला. नियमांनुसार त्यावेळी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले.यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. फिर्यादीनुसार, संबंधितांपैकी काळ्या रंगाचा सफारी ड्रेस घातलेल्या व्यक्तीने डॉक्टर रुपनवर यांची चौकशी करत “तुम्हारा नाम क्या है” आणि “आप यहाँ किस पोस्ट पर हो” असे प्रश्न विचारले.

त्यानंतर प्रसाद कोंडे-देशमुख यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (एम.एस.) मदने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक मागितला. डॉक्टरांनी तो देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याकडून क्रमांक मिळवून थेट मदने मॅडम यांच्याशी संपर्क साधला.सुमारे 7.15 वाजता मदने मॅडम रुग्णालयात आल्या. त्यांनी संबंधितांची कागदपत्रे पाहून स्वतःच्या सही व शिक्क्याने ‘फिट फॉर’ प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांनी डॉ. रुपनवर यांना कार्यालयात बोलावले.

त्या वेळी कार्यालयात मदने मॅडम, डॉ. रुपनवर, प्रसाद कोंडे-देशमुख, परदेशी आणि त्यांच्यासोबत आलेला आणखी एक व्यक्ती उपस्थित होता, तर दोन जण कार्यालयाच्या बाहेर उभे होते.कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान मदने मॅडम यांनी मोबाईल क्रमांक का दिला नाही, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. रुपनवर यांनी ओपीडीची वेळ संपल्यानंतर संबंधित आले होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक देणे हे माझे काम नसल्याने तो दिला नाही, असे सांगितले.

फिर्यादीनुसार, त्यानंतर प्रसाद कोंडे-देशमुख यांनी अरेरावीची भाषा वापरत डॉक्टरांना दमदाटी सुरू केली. डॉक्टरांनी “मला दमदाटी करू नका” असे सांगितल्यानंतर बाहेर उभा असलेला काळ्या सफारीतील इसम संतप्त अवस्थेत कार्यालयात घुसला. त्याने “क्या बोल रहा है” असे म्हणत डॉ. रुपनवर यांच्या अंगावर धाव घेत त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली आणि त्यांना कार्यालयाच्या दरवाजापर्यंत ओढत नेत “मार दूँगा” अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याचवेळी प्रसाद कोंडे-देशमुख यांनी “हे तुला खूप महागात पडेल, उद्या सकाळी समजेल मी कोण आहे,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारावेळी वैद्यकीय अधीक्षक मदने मॅडम तसेच रुग्णालयातील शिपाई गणेश हे उपस्थित असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेनंतर डॉ. रुपनवर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यावरून संबंधितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे, दमदाटी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.उपजिल्हा रुग्णालयात शासकीय डॉक्टराला ड्युटीवर असताना झालेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!