महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांना रुग्णाशी कथित उध्दट वर्तन केल्याच्या आरोपानंतर तातडीने कार्यमुक्त करण्यात आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेबरोबरच निर्णय प्रक्रियेवरही विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काही कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी केला आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. लिला आ. मदने यांनी २९ जुलै २०२६ रोजी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, २८ जुलै रोजी प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आले होते. त्यावेळी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी त्यांच्याशी उध्दटपणे वर्तन केल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षकांचा मोबाईल क्रमांक विचारण्यात आल्यानंतर “मी वैद्यकीय अधिकारी आहे, मी काय शिपाई आहे का?” असे उत्तर दिल्याचाही उल्लेख आदेशात आहे. परंतु दुसरीकडे संबंधित व्यक्तीने स्वतःला एका माजी मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक (PA/OSD) असल्याचे सांगून कारवाई करण्यास भाग पाडले का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
कार्यालयीन आदेशात या प्रकारामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठ कार्यालयाकडे चुकीचा संदेश जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुणे येथील उपसंचालक, आरोग्य सेवा तसेच सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दूरध्वनीवरील सूचनांनुसार डॉ. रुपनवर यांना २९ जुलै रोजी कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित व्यक्तीने स्वतःला एका माजी मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक (PA/OSD) असल्याचे सांगितल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीची अधिकृत ओळख आणि अधिकारांची शहानिशा प्रशासनाने केली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ एखाद्या व्यक्तीच्या तोंडी तक्रारीवर किंवा दूरध्वनीवरील सूचनांच्या आधारे एवढी कठोर कारवाई करणे कितपत योग्य आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
याचबरोबर काहींकडून असा आरोप करण्यात येत आहे की, कामकाजाच्या वेळेनंतरही प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकण्यात आला, दादागिरी करण्यात आली, धमकी देण्यात आली तसेच डॉक्टरांशी गैरवर्तन झाल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन जणांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, डॉ. राजेंद्र रुपनवर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार घटनाक्रम काय घडला, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले होते का, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती का, याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी संघटना तसेच वैद्यकीय संघटनांनीही भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉक्टरांवर अन्याय झाला असल्यास त्यांना न्याय मिळावा आणि दुसरीकडे रुग्णाशी गैरवर्तन झाले असल्यास त्याचीही निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी भूमिका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.सध्या या प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि या घटनेची सखोल चौकशी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

