वारकऱ्याच्या ७० हजारांच्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क |
फलटण प्रतिनिधी
पंढरपूर वारीहून परतणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याला लक्ष्य करून दगडफेक, मारहाण आणि त्यानंतर ७० हजार रुपयांची जबरी चोरी झाल्याचा गंभीर आरोप समोर आली होता या घटनेपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, डायल ११२ वरून पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आल्यानंतरही संबंधित घटनेची नोंद न झाल्याचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना संबंधित वारकऱ्यांनी केला होता. त्यामुळे फलटण शहर व ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सदर घटनेबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस विभाग जागा झाला व याबाबत सुमारे सात दिवसानंतर संबंधित फिर्यादी कडून तक्रार दाखल करून घेण्यात आली. तक्रारीनुसार, त्रंबक अश्रुबा कोळेकर (वय ७२, रा. मोरवड, ता. वडवणी, जि. बीड) हे दिंडेकरी वारकरी दि. ५ जुलै रोजी पंढरपूरहून पुण्याकडे परत जात होते.
मौजे काशीदवाडी (ता. फलटण) येथे मध्यरात्री विश्रांती घेत असताना काही अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक करून परिसरात गोंधळ निर्माण केला. या प्रकारात ते बेशुद्ध पडल्याचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून त्यातील रोख ७० हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाल्याचा आरोप आहे.
घटना घडल्यानंतर तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जखमी अवस्थेमुळे त्यावेळी औपचारिक तक्रार देता आली नाही, असे दि. १२ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधितांनी सासवड येथे उपस्थित राहून अज्ञात आरोपींविरुद्ध चोरी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे डायल ११२ वरून माहिती मिळूनही घटनास्थळी गेलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी स्टेशन डायरीत घटनेची नोंद केली नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
जर हा आरोप खरा ठरला, तर पोलीस कर्मचाऱ्यांचा हा केवळ निष्काळजीपणाचा नव्हे तर कर्तव्यातील गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार मानला जाऊ शकतो.राज्यात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठमोठे दावे केले जात असताना, एका वृद्ध वारकऱ्याला जबरी चोरीचा सामना करावा लागणे आणि त्यानंतरही तातडीची कायदेशीर प्रक्रिया न झाल्याचा आरोप समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
त्यामुळे या घटनेची स्वतंत्र विभागीय चौकशी करून, त्या रात्री डायल ११२ कॉलची नोंद, कंट्रोल रूमचा रेकॉर्ड, घटनास्थळी गेलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती, स्टेशन डायरीतील नोंदी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या अहवालाची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
या प्रकरणात कर्तव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई होणार का, की हे प्रकरणही दडपले जाणार, याकडे वारकरी, नागरिक आणि सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

