अवघ्या एका वर्षात बारामतीत गॅलेक्सी मल्टिस्टेटची दुसरी शाखा; विस्ताराची घोडदौड कायम
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | बारामती प्रतिनिधी
के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत कार्यरत गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या ८ व्या शाखेचे बारामती येथे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. नव्या शाखेचे उद्घाटन गॅलेक्सी मल्टिस्टेटचे संस्थापक व चेअरमन तसेच के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक सचिन यादव आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सभासद, ग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात बारामती शहरात गॅलेक्सी मल्टिस्टेटची ही दुसरी शाखा सुरू झाली आहे. पुण्यात यापूर्वीच संस्था कार्यरत असून, राज्यातील ही संस्थेची ८ वी शाखा ठरली आहे.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये शाखांचे जाळे विस्तारत ग्राहकांना विश्वासार्ह, पारदर्शक आणि दर्जेदार आर्थिक सेवा देण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.उद्घाटनप्रसंगी बोलताना सचिन यादव यांनी सांगितले की, “गॅलेक्सी मल्टिस्टेटचे ध्येय केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत विश्वासू भागीदार बनणे हे आहे. भविष्यात आणखी अनेक शहरांमध्ये शाखा सुरू करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत दर्जेदार आर्थिक सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.
” त्यांनी गॅलेक्सीच्या गोल्ड लोन सुविधेचाही विशेष उल्लेख करत, गरजेच्या वेळी ग्राहकांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज हा कृषी, जैविक शेती, निर्यात, सहकार, आयुर्वेद आणि विविध उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला अग्रगण्य उद्योगसमूह आहे.
करार शेतीच्या माध्यमातून समूहाने २५ हजार शेतकऱ्यांना जोडत युरोपियन देशांमध्ये दररोज १५ टन कृषी उत्पादनांची निर्यात करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. रोजगारनिर्मिती, शेतकरी विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत समूहाने आजवर २ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
गॅलेक्सी ग्रुपची वार्षिक उलाढाल १७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, फलटणमध्ये ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता बारामतीतही संस्थेने आपले मजबूत पाऊल रोवले आहे.यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी गॅलेक्सीच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि वाढत्या शाखा विस्ताराचे कौतुक केले. बारामतीसारख्या विकसित होत असलेल्या शहरात दुसरी शाखा सुरू झाल्याने नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, किरण तावरे, फलोत्पादन संघाचे चेअरमन वसंत घनवट, भाऊसाहेब काटे तसेच ॲडव्होकेट खारतोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

