श्रीराम बाजारातील धान्य-तेल विभागासमोर उघड्यावर सांडपाणी; ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, तातडीने उपाययोजनांची मागणी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

फलटण शहरातील गजबजलेल्या श्रीराम बाजार परिसरातील धान्य-तेल विभागासमोर उघड्यावर बाजाराचे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ग्राहक, व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज शेकडो ग्राहक या विभागात धान्य, किराणा आणि खाद्यतेल खरेदीसाठी येत असतात. मात्र, सांडपाणी थेट येण्या जाण्याच्या ठिकाणी सोडण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्राहकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

धान्य-तेल विभागासमोर साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसर चिखलमय झाला असून याठिकाणी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना सावधपणे या परिसरातून जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे परिसरात डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्नधान्य विक्रीच्या ठिकाणी अशी अस्वच्छ परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.साठलेल्या सांडपाण्यामुळे या ठिकाणी आलेले ग्राहक माघारी जात आहेत.

या समस्येमुळे बाजाराचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे ग्राहकांचा ओढा कमी होत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. अनेक वेळा संबंधितांकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.श्रीराम बाजार हा फलटण शहरातील प्रमुख व्यापारी बाजार असल्याने येथे स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मात्र, प्रत्यक्षात उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याने बाजाराच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची श्रीराम बाजार संचालकांनी तातडीने दखल घेऊन सांडपाण्याची योग्य निचरा व्यवस्था करावी, परिसराची स्वच्छता करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. श्रीराम बाजार संचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!