शासकीय वेतन देयकांत फेरफार करून ३५ लाखांचा अपहार; फलटणमध्ये कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध गुन्हा

बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप; १०.३४ लाख रुपये कार्यालयीन खात्यात परत भरल्याचे तपासात समोर

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांमध्ये कथित फेरफार करून ३५ लाख ३२ हजार ४४१ रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत अशोक महादेव कोकरे (वय ३७), उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग, फलटण, यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू नुरमहमद पठाण, रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रथम खबर नोंदणी क्र. ३०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(५), ३४०(२), २३८, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ ते मार्च २०२६ या कालावधीत राजू पठाण हे ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. उपविभाग फलटण येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी शासकीय पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून वापरल्याचा आरोप आहे.

‘सेवार्थ’ प्रणालीतील वेतन देयकांमध्ये फेरफारफिर्यादीनुसार, शासकीय संगणक प्रणाली ‘सेवार्थ’ मधून कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांच्या प्रती काढल्यानंतर त्यातील वेतनाच्या रकमेच्या आकड्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. त्यानंतर तयार केलेल्या कथित बनावट देयकांवर कार्यालयातील तत्कालीन उपअभियंत्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.त्यानंतर ही देयके पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी सादर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कार्यालयीन कामाचा भाग म्हणून देयकांच्या प्रती जतन करणे अपेक्षित असतानाही संबंधित प्रती जतन न करता नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.३५.३२ लाखांचा अपहार; १०.३४ लाख रुपये परत भरल्याचा दावाया प्रकारे वेतन देयकांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून कार्यालयाच्या ३५ लाख ३२ हजार ४४१ रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, तपासादरम्यान राजू पठाण यांच्या नातेवाईकांमार्फत १० लाख ३४ हजार ३४९ रुपये ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्यात वेळोवेळी जमा करण्यात आल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर, शासकीय संगणक प्रणालीतील वेतन देयकांमध्ये कथित फेरफार, कागदपत्रे नष्ट करणे आणि शासकीय निधीचा अपहार अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यात २० ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास मपोउपनि गाजरे करीत आहेत.दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे गुन्हा दाखल झाल्यानंतरच्या फिर्यादीतील माहितीनुसार असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच आरोपांची सत्यता आणि आर्थिक गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!