फलटण प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा खासगी इसम रंगेहाथ जेरबंद

फेरफार रद्द अपीलात बाजूने निकाल मिळवून देण्याचे आमिष; फलटणच्या गिरवी चौकात एसीबीची सापळा कारवाई

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी तसेच अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सातारा पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे फलटणमध्ये खळबळ उडाली आहे.विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुरुष असून त्यांचे वय ४५ वर्षे असून ते शेती व्यवसाय करतात. मौजे टाकळवाडे, ता. फलटण येथील गट क्रमांक १३४, १४० व १४४ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीवर तक्रारदार, त्यांचे आजोबा व अन्य हिस्सेदारांची नावे आहेत.

गट क्रमांक १३४ मधील एका हिस्सेदाराने तक्रारदार यांची सहहिस्सेदार म्हणून परवानगी न घेता आपल्या हिस्स्याची जमीन परस्पर विक्री केल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. जून २०२६ मध्ये फेरफार क्रमांक २२५७ पाहिल्यानंतर ही बाब समोर आली.

यानंतर तक्रारदारांनी सदर फेरफार रद्द करण्यासाठी २४ जून २०२६ रोजी अपील दाखल केले. फेरफार सन २०२३ मध्ये झालेला असल्याने अपील दाखल करण्यास असलेली ६० दिवसांची मुदत संपली होती. त्यामुळे विलंबमाफीचा अर्ज प्रांताधिकारी कार्यालय, फलटण येथे दाखल करण्यात आला.

दरम्यान, तक्रारदार हे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रांताधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्या ओळखीचा खासगी एजंट विकास तोडकर याने तक्रारदारांकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.तक्रारदारांनी या संदर्भात २५ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्याकडे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीकडून २५, २७ आणि ३१ ऑगस्ट २०२६ रोजी गिरवी चौक, फलटण येथे पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या पडताळणीमध्ये आरोपी विकास तोडकर याने प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याकडे असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी तसेच अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसाठी ५० हजार रुपये आणि अपीलाचा निकाल झाल्यानंतर स्वतःसाठी १० हजार रुपये, अशी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.

लॉ कॉलेजसमोर सापळा

या पडताळणीच्या आधारे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी गिरवी चौक, फलटण येथील लॉ कॉलेजसमोर पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान विकास शंकर तोडकर यास ५० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७अ अन्वये फलटण शहर पोलीस ठाणे, जि. सातारा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.

या कारवाईचे नेतृत्व शैला कोरडे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केले. त्यांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र तसेच अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.सापळा पथकात पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार निलेश राजपूरे, पोलीस हवालदार गणेश ताटे, महिला पोलीस नाईक प्रियंका जाधव आणि चापोलीस हवालदार अजित कर्णे यांचा समावेश होता.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!