महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : पुसेगाव-फलटण मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. पावसामुळे घाटातील दगड सैल होऊन थेट कारच्या पुढील काचेवर कोसळल्याने हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पोपट जगताप (वय २७, रा. आंबे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) हे एमएच ४२ बीई २२४६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून प्रवास करत होते.
ताथवडे घाटातून फलटणकडे येत असताना अचानक मोठा दगड वाहनाच्या समोरील काच फोडून चालकाच्या अंगावर कोसळला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर जाऊन धडकली.अपघातानंतर योगेश जगताप यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
या वाहनात आणखी तीन जण प्रवास करत होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून घटनेची माहिती तहसील प्रशासनालाही देण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशांत सुबनवळ अधिक तपास करीत आहेत.

