विडणी महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड

फलटण प्रतिनिधी | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या २० वर्षीय आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील २४ फाटा परिसरात ही घटना घडली. संबंधित महिला शेतातील काम आटोपून घरी जात असताना आरोपीने निर्मनुष्य ठिकाणाचा फायदा घेत ऊसाच्या शेतातून पळत तिचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाला.

याप्रकरणी महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन तपास पथके तयार केली. आरोपीचा शोध घेत असताना तो विडणी गावातील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला आरोपीने चोरी केल्याचे नाकारत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक चौकशीत केरळ येथे फिरण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने चोरी केल्याचे आरोपीने सांगितले.

आरोपीला तपासकामी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडे अधिक तपास सुरू असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कड्डुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे आणि अविनाश शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

आरोपीकडून चौकशीदरम्यान एकूण १४ गुन्हे उघडकीस

आरोपी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याच्याकडून या गुन्ह्यांतील सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील २४ फाटा येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आरोपीने जबरदस्तीने काढून नेले होते. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना फलटण ग्रामीण पोलिसांच्या अपराध प्रकटीकरण शाखेने आरोपी अथर्व उर्फ चिन्मय सुतार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने विडणी परिसरात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून चौकशीदरम्यान शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे तसेच जबरी चोरी आणि इतर चोरीचे मिळून एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये डिझेल पंप/मोटार चोरीचे अनेक गुन्हे असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून खालील प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत—

  • जबरी चोरीचा प्रयत्न – १ गुन्हा
  • जबरी चोरी – १ गुन्हा
  • डिझेल पंप/मोटार चोरी – ७ गुन्हे
  • इतर चोरी – ५ गुन्हे

या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने आणखी काही गुन्ह्यांची माहिती दिल्याने त्याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांचा छडा लागल्याने पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सदरची कारवाई फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अपराध प्रकटीकरण शाखेने केली असून, उघडकीस आलेल्या सर्व गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!