बनावट मूल्यांकन दाखला प्रकरणी फलटण मधील नामांकित आठ बिल्डरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

कोळकी येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 प्रकरण; तहसीलदारांच्या आदेशानंतर निवासी नायब तहसीलदारांची फलटण शहर पोलिसांत तक्रार

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : मौजे कोळकी, ता. फलटण येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 या जमिनींचा भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संशयित आरोपी रणधीर धनसिंगराव भोईटे यांच्यासह अन्य सात जमीनधारकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार अभिजित अशोक सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दि. 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदेशान्वये सोनवणे यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.मिळालेल्या माहितीनुसार, रणधीर धनसिंगराव भोईटे यांनी दि. 11 जून 2025 रोजी कोळकी येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता.

या अर्जासोबत सहायक दुय्यम निबंधक वर्ग-2, फलटण यांचे कार्यालयीन शिक्का असलेला दि. 19 जून 2025 रोजीचा मूल्यांकन दाखला सादर करण्यात आला होता.या दाखल्याच्या आधारे संबंधित जमिनींचे एकूण मूल्यांकन 35 लाख 1 हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. त्याच्या 50 टक्के रकमेप्रमाणे 17 लाख 51 हजार रुपये नजराणा रक्कम अर्जदाराने दि. 23 जून 2025 रोजी शासकीय तिजोरीत जमा केली.

त्यानंतर तहसील कार्यालयाकडून दि. 26 जून 2025 रोजी भोगवटादार वर्ग-2 चा शेरा कमी करून जमीन वर्ग-1 करण्याचा आदेश पारित करण्यात आला.दरम्यान, एका तक्रारदाराने दि. 29 जुलै 2025 रोजी तक्रार दाखल करून संबंधित मूल्यांकन दाखला बनावट असल्याचा आरोप केला. त्यानंतर सहायक दुय्यम निबंधक वर्ग-2, फलटण क्र. 2 यांनी दि. 25 जुलै 2025 रोजीच्या पत्राद्वारे दि. 19 जून 2025 रोजीचा मूल्यांकन दाखला बनावट असल्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर तहसील कार्यालयाने रणधीर धनसिंगराव भोईटे व इतरांना नोटीस बजावून त्यांचा लेखी खुलासा घेतला. तसेच नव्याने करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार गट नं. 79/1/1 व 79/1/5 या क्षेत्राचे मूल्यांकन 43 लाख 33 हजार रुपये, तर गट नं. 80/1 पैकी क्षेत्राचे मूल्यांकन 33 लाख 26 हजार रुपये, असे एकूण 76 लाख 59 हजार रुपये निश्चित करण्यात आले.या नव्या मूल्यांकनाच्या 50 टक्के रकमेप्रमाणे 38 लाख 29 हजार 500 रुपये नजराणा रक्कम येत असल्याने त्यापैकी उर्वरित 20 लाख 80 हजार रुपये दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी रणधीर भोईटे यांच्याकडून शासकीय तिजोरीत जमा करून घेण्यात आले.

त्यानंतर दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित गटांबाबत दुरुस्त आदेश पारित करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणात शासनाच्या महसुलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी, सातारा यांनी दि. 13 एप्रिल 2026 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदार यांनी केलेला तक्रार अर्ज निकाली काढला होता.मात्र, दुसऱ्या तक्रारदार यांनी दि. 15 जून 2026 रोजी स्वतंत्र अर्ज करून बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत रणधीर धनसिंगराव भोईटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात रणधीर धनसिंगराव भोईटे यांच्यासह निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव झांजुर्णे आणि विरेंद्र विक्रम झांजुर्णे यांच्याविरुद्ध बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

तहसीलदारांच्या प्राधिकृत आदेशानंतर निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आता या प्रकरणात पोलीस तपासातून मूल्यांकन दाखला नेमका कसा तयार झाला, तो कोणी तयार केला आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.सदर प्रकरणी संशयित आरोपी रणधीर धनसिंगराव भोईटे,विक्रम महादेवराव झांजुर्णे, राजेंद्र सदाशिव कापसेयांना अटक करण्यात आली असून संशयित आरोपी निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजीत तुकाराम इंगळे, विरेंद्र विक्रम झांजुर्णे हे पाच संशयित आरोपी फरार आहेत.

अटक संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.

error: Content is protected !!