ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याच्या मधोमधच पाण्याचे तळे, बाजारासाठी आलेल्या नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे हाल

l ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) l ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्यांची खड्ड्यामुळे अक्षरश चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. आज मंगळवार २४ रोजी ढेबेवाडीचा बाजार असल्याने व्यापारी व नागरिकांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

संबंधित विभागाने हे खड्डे भरण्याची तसदी न घेतल्याने गावातील नागरिकांसह वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ढेबेवाडी सह परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने खड्ड्यात पाणी साचून खड्डे आणखीनच मोठे होत आहेत.

ढेबेवाडी चौक ते बाजार तळ रस्त्यावर खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. खड्ड्यातून वाहन जाताना पादचारी नागरिकांच्या आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावरती घाण पाणी उडत आहे. दुचाकी वाहनांना नेमका कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडत आहे.

अनेक दुचाकीस्वारांना खड्याचा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ढेबेवाडी गावचा आज बाजार असल्याने या रस्त्यावर व्यापारी व नागरिकांची खूप वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फे बाजार असल्याने विशेष बाजारासाठी आलेल्या महिला वर्गाला या खड्ड्यातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

अद्याप पावसाळा दोन ते तीन महिने शिल्लक असून त्यावेळेपर्यंत रस्त्याची काय अवस्था होईल याचा विचारच न केलेला बरा. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी येथील व्यापारी व नागरिक करत आहेत.

error: Content is protected !!