महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : फलटण नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अजब व निष्काळजी कार्यपद्धतीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, सकाळच्या वेळेत दिवस उजाडण्याआधीच शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे पहाटेच्या अंधारातच नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
शहरातील बाजारपेठ परिसर, वसाहती, शाळा–महाविद्यालयांकडे जाणारे रस्ते तसेच दवाखाने व सार्वजनिक कार्यालयांकडे जाणाऱ्या मार्गांवरील दिवे अनेक वेळा सकाळी सव्वासहा वाजताच बंद करण्यात येतात. मात्र या वेळेत अद्यापही अंधार असल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पहाटे कामावर जाणारे कामगार, शेतकरी, दूध विक्रेते, रुग्णालयात जाणारे रुग्ण व नातेवाईक, तसेच सकाळी लवकर शाळा-महाविद्यालयासाठी घराबाहेर पडणारे विद्यार्थी यांना या अंधाराचा मोठा फटका बसत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत यामुळे रस्त्यावरील दिवे लवकरच बंद असल्याने अपघातांचा धोका वाढत असून, चोरी, छेडछाड व असामाजिक घटकांच्या हालचाली वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, स्मार्ट सिटी, ऊर्जा बचत व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात मात्र मूलभूत सुविधा योग्य वेळेत उपलब्ध करून देण्यात विद्युत विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे दिवे लवकर बंद केले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत अनेक नागरिकांनी संबंधित ठेकेदार व नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस सुधारणा झालेली नाही. “दिवस पूर्णपणे उजाडल्यानंतरच पथदिवे बंद करावेत तसेच वेळापत्रकात तात्काळ सुधारणा करावी,” अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत विभागाच्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

