महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
फलटण नगरपरिषदेतील मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांच्या रकमेच्या कथित अपहारप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात फसवणूक झाल्याची शंका असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन फलटण शहर पोलिसांनी केले आहे.
पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दि. १५ मार्च २०२२ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत फलटण नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, नितीन देवदास वाळा आणि शरद माधव अहिवळे (सर्व रा. फलटण) यांनी नागरिकांकडून मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर करांच्या स्वरूपात रक्कम स्वीकारली. मात्र, ही रक्कम शासनाकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ₹१,५०,३९९ इतक्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे फलटण नगरपरिषद तसेच संबंधित मालमत्ताधारकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी फलटण नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक जगदीश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २८ जुलै २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
ज्या नागरिकांनी यापूर्वी फलटण नगरपरिषदेमध्ये मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी किंवा इतर कोणताही कर भरला असेल; परंतु त्यांना अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा संबंधित व्यवहारात फसवणूक झाल्याची शंका असेल, त्यांनी तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यासंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा तक्रार नोंदविण्यासाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:- घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक – ९८८११४९६०१, मिठू जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक – ९०२११९६०२२ अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

