सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एमएसईबी) को-ऑप. क्रेडिट सोसायटीला राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ पुरस्कार २०२५’

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

पुणे :सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एमएसईबी) को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे या संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२५” प्रथम क्रमांकाने जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार संस्थेला सलग सातव्यांदा मिळाला असून संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीचा हा गौरव मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील पतसंस्थांसाठी “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२५” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एमएसईबी) को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे यांनी सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. आर्थिक शिस्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कर्जवसुलीची सक्षम यंत्रणा, सहकार चळवळीतील योगदान तसेच सामाजिक कार्य या निकषांवर संस्थेच्या प्रस्तावाची निवड करण्यात आली आणि संस्थेला प्रथम क्रमांकाचा “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी आर्यन रिक्रिएशन रिसॉर्ट, नसरापूर (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पार पडला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी तसेच फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अभि. शिवाजीराव कृष्णराव लाड, सचिव अभि.रविंद्र ननवरे, कार्यलक्षी संचालिका सौ. प्रद्मा प्रदीप पवार तसेच वसुली अधिकारी सौ. भाग्यश्री राजय ताठे उपस्थित होते.संस्थेच्या ठेवींचे वाढते प्रमाण, कर्ज थकबाकीवर प्रभावी नियंत्रण, सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि आर्थिक शिस्त या सर्व बाबींमध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ही कामगिरी संस्थेचे अध्यक्ष अभि. शिवाजीराव कृष्णराव लाड यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शक्य झाली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.या यशाबद्दल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., पुणे, अविज पब्लिकेशन बँको, कोल्हापूर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पुणे, कॉसमॉस बँक लि., पुणे, संस्थेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच अंतर्गत लेखापरीक्षक जी. जी. धन अनगळ अॅण्ड कंपनी, पुणे आणि वैधानिक लेखापरीक्षक जे. आर. टी. अॅण्ड असोसिएट्स, पुणे यांचे संस्थेने मनःपूर्वक आभार मानले आहेत.

संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली असून भविष्यातही सहकार क्षेत्रात आदर्श काम करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!