सातारा नगरपालिकेजवळ रात्री घडली धक्कादायक घटना; वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासकीय यंत्रणेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सातारा नगरपालिकेच्या परिसरात ही घटना घडली. काही युवकांनी अचानक नागेश पाटील यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित युवकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती शहरभर पसरताच सातारा शहर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.सातारा शहर पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, ताब्यात घेतलेल्या युवकांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

