पत्रकारितेचा निर्भीड चेहरा, सत्यासाठी झगडणारी लेखणी: शामराव अहिवळे यांचा गौरवशाली प्रवास

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क:-पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून, अन्यायाला वाचा फोडण्याची एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी गेली तब्बल ४२ वर्षे प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पार पाडणारे नाव म्हणजे ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे.सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मध्ये कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

अनिल साबळे आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या लेखणीची धार अधिक तीक्ष्ण केली. पुढे १९८७ साली फलटण येथे साप्ताहिक गंधवार्ता ची स्थापना करून त्यांनी स्वतंत्र पत्रकारितेची वाट धरली.त्यांच्या नेतृत्वाखाली गंधवार्ता ने सातत्यपूर्ण आणि यशस्वी वाटचाल केली. १९९४ मध्ये या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर करून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपला आहे. त्यांच्या लेखणीतून समाजातील ज्वलंत प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली गेली. शासकीय अधिकाऱ्यांची लाचखोरी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, अतिक्रमण, आरोग्य सुविधा तसेच महिलांवरील अन्याय अशा विविध विषयांवर त्यांनी परखडपणे लिखाण केले.

त्यांच्या लिखाणामुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आणि प्रशासनालाही जाग आली.त्यांच्या राजकीय लिखाणाची खासियत म्हणजे प्रभावी मांडणी, म्हणींचा वापर आणि पद्यात्मक हेडिंग. समाजोपयोगी निर्णयांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले, तर चुकीच्या निर्णयांवर त्यांनी निर्भीडपणे टीका केली. या भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र न्यायालयाने प्रत्येक वेळी सत्याच्या बाजूने उभे राहत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले.

पत्रकारितेबरोबरच त्यांनी संघटनात्मक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक-मुद्रक-संपादक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पत्रकारांच्या हक्कांसाठी विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी त्यांनी लढा दिला, तसेच फलटण एस.टी. आगाराच्या अनागोंदी कारभाराविरोधातही आवाज उठवला.

आंबेडकरी चळवळीतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. फलटण शहरात दलित पॅंथरच्या स्थापनेपासून त्यांनी सामाजिक न्यायासाठी सक्रिय भूमिका बजावली. विविध चळवळींना त्यांनी आपल्या लेखणीतून बळ दिले आणि त्या शासनदरबारी पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य केले.त्यांच्या कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी करण्यात आला आहे. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, फलटण यांच्याकडून सन्मान, २०१७ मध्ये भीमस्फूर्ती पुरस्कार, २०१९ मध्ये मूकनायक पुरस्कार आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठित ‘ज्येष्ठ संपादक दर्पण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

आजच्या वाढदिवसानिमित्त समाजहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि पत्रकारितेचा आदर्श जपणाऱ्या ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा!त्यांच्या लेखणीला अजून अधिक बळ मिळो आणि समाजासाठी त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.

error: Content is protected !!