फलटण येथे बेकायदेशीर मळी वाहतूक उघड; पीयूसी, इन्शुरन्स व फिटनेसशिवाय टँकर रस्त्यावर

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात मळी (डिस्टिलरी वेस्ट) वाहतुकीसाठी वापरले जाणारे अनेक टँकर बेकायदेशीररित्या रस्त्यावर धावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या टँकरकडे आवश्यक कागदपत्रांचा पूर्ण अभाव असून, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक टँकरकडे पी.यू.सी. (Pollution Under Control) प्रमाणपत्र नाही, इन्शुरन्स (विमा) नाही तसेच फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही हे टँकर खुलेआम मळीची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मळी ही अत्यंत प्रदूषणकारी आणि पर्यावरणासाठी घातक घटक मानली जाते. अशा प्रकारच्या रासायनिक द्रवाची वाहतूक करताना शासनाने कडक नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र, फलटण तालुक्यात हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे.

बेकायदेशीर टँकरद्वारे मळीची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून, एखादा अपघात झाल्यास मळी सांडून शेती, पाणीस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष.

राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच आरटीओ प्रशासन यांच्याकडून या टँकरांची कोणतीही ठोस तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या या अवैध व्यवसायामुळे शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, काही टँकरवर नोंदणी क्रमांक अस्पष्ट असल्याचे, तर काही ठिकाणी बनावट नंबर प्लेटचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंगापुरता मर्यादित नसून, मोठ्या गैरव्यवहाराशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. बेकायदेशीर टँकर जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, सर्व टँकरची कागदपत्रे तपासावीत आणि मळी वाहतुकीवर कडक नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!