महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण नगरपरिषद हद्दीतील १६ वी जनगणना प्रक्रिया १ मे २०२६ पासून सुरू होत असून, यंदाची जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात मोबाईल अॅपच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
जनगणनेद्वारे गोळा होणारी सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती ही भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शासकीय योजना, निधीचे योग्य वाटप आणि विविध सुविधा प्रभावीपणे राबवण्यासाठी ही माहिती आधारभूत मानली जाते.ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ (सेल्फ एन्युमरेशन) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या घराची स्थिती, उपलब्ध सुविधा व मालमत्तेची माहिती ऑनलाइन भरू शकतात. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.
शहरातील १३ प्रभागांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यासाठी एकूण ९६ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटाकडे सरासरी १८० ते २०० घरे आणि ७०० ते ८०० नागरिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना ५ ते ७ मे २०२६ दरम्यान विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनगणनेनंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार असून, भविष्यातील शासकीय कामकाजासाठी हा क्रमांक जतन करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक नागरिकास एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी अचूक माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.

