महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि देशाला दिशा देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांची भूमी असून, या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचा ठाम सूर फलटणमध्ये उमटला. अलीकडच्या काळात इतिहासाचे विकृतीकरण आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास या दोन गंभीर प्रश्नांकडे राज्यकर्त्यांनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील साहित्यिकांनी केली.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन आणि वन विभाग, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३८ व्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. इतिहास मांडताना सखोल अभ्यास, जबाबदारी आणि संवेदनशीलता आवश्यक असून, कोणत्याही थोर युगपुरुषांचा अवमान होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना उपस्थितांनी वाढत्या तापमानाची आणि झपाट्याने होत असलेल्या वृक्षतोडीची तीव्र चिंता व्यक्त केली. “दिवसाढवळ्या झाडांची कत्तल सुरू आहे,” असे नमूद करत पर्यावरण संरक्षणासाठी शासनाने कडक धोरणे राबवावीत, तसेच प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.या साहित्यिक संवादातून इतिहास संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
समाज परिवर्तनाच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणे योग्य आहे का, यावर गंभीर चिंतन होणे आवश्यक असल्याचेही वक्त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले, संयोजक ताराचंद्र आवळे, पर्यावरणप्रेमी सुधीर इंगळे, सचिन जाधव, महादेवराव गुंजवटे, प्रा. विकास शिंदे, प्रमोद सस्ते, ॲड. रोहिणी भंडलकर, श्रेयस कांबळे, अतुल चव्हाण, अविनाश चव्हाण आदींनी आपली मते मांडली.
यावेळी ताराचंद्र आवळे संपादित ‘युवा स्पंदन’ या स्मरणिकेचे तसेच प्रभाव या प्रा. विक्रम आपटे लिखित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. विक्रम आपटे, विनायकराव ननावरे, शुभम रणदिवे, विक्रम भांडवलकर, आप्पासाहेब तांबे, सविता तांबे, योगेश गंगतीरे, मयूर शेरखाने, गणेश गुळवे, राजकुमार काकडे, अमोल जाधव, सचिन भांडवलकर यांच्यासह फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

