महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण २६ मे २०२६ : सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमार्फत सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले मोबाईल शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, फलटण शहर पोलिसांनी या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचे ४० हरवलेले मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कदम यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाणे चे प्रभारी पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सी.ई.आय.आर. पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करत ही कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यांतून मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजित जाधव आणि पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस प्रशासनाचे कौतुक केले. सन २०२४ पासून आजअखेर फलटण शहर पोलिस ठाणे कडून तब्बल ५५५ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे आणि पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी नागरिकांना मोबाईल चोरी अथवा हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कारवाईत महिला पोलिस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे तसेच सी.ई.आय.आर. पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलिस अंमलदार स्वप्नील खराडे, राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांनी विशेष सहभाग घेतला.

