महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : सोमवार पेठेतील क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्था, फलटण येथील संस्थापक सदस्य अथवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांनी केलेल्या आवास योजनेच्या मागणीस मंजुरी देऊन निवासी जागा नियमित करण्यात याव्यात. तसेच सदर परिसरास “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी लोकशाही भारत न्यूजचे संपादक सागर चव्हाण यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार दिवंगत लोकनेते हिंदुराव ना. निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सोमवार पेठेतील काही कुटुंबप्रमुखांना एकत्रित करून त्यांच्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्था स्थापन केली होती.यामधील बरीच कुटुंबे स्थलांतरित झाली असून काही मूळ कुटुंबे त्याच ठिकाणी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
या कुटुंबांतील वारसदार अथवा सदस्य फलटण नगरपालिकेकडे आवास योजनेसाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांच्या मागणीचा योग्य प्रकारे विचार केला जात नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळातील बहुतांश पदाधिकारी हयात नसून अनेक सदस्य व त्यांचे वारसदार स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे संस्थेची मूळ कार्यकारिणी सध्या अस्तित्वात नाही.
अशा परिस्थितीत संस्थेतील मूळ संस्थापक सदस्य अथवा त्यांच्या वारसदारांनी केलेल्या अर्जांचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांना शासन निर्णयानुसार निवासी जागा नियमित करण्याचा तसेच आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय जागेवरील १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत शासन निर्णय काढला असून त्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. त्यामुळे सदर जागेतील अनाधिकृत सरकारी प्रॉपर्टीधारक तसेच क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्था यामधील संस्थापक सदस्य अथवा त्यांच्या वारसदारांकडून निवासी जागा नियमित करण्यासाठी फलटण नगरपालिकेमध्ये अर्ज करण्यात येत आहेत.
शासन निर्णयानुसार त्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित कुटुंबांच्या निवासी जागा नियमित करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.तसेच फलटण नगरपालिकेच्या पहिल्या सभेमध्ये फिरंगाई देवी मंदिर परिसराला “श्री फिरंगाई देवी नगर” असे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
मात्र सदर जागा क्रांतिसिंह नाना पाटील मागासवर्गीय गृहरचना सहकारी संस्था यांच्या नावावर असून त्याची नोंद फलटण नगरपालिकेमध्ये तसेच महसूल विभागामध्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे तत्कालीन खासदार दिवंगत हिंदुराव ना. निंबाळकर यांच्या दूरदृष्टीचा विचार करून त्या परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव देण्यात यावे.
फलटण नगरपालिकेने शहरातील विविध परिसरांना महापुरुषांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची नावे दिली आहेत. त्याच धर्तीवर सोमवार पेठेतील या परिसराचाही पुनर्विचार करून आगामी सर्वसाधारण सभेमध्ये “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” असे नाव मंजूर करण्यात यावे, अशी मागणी सागर चव्हाण यांनी केली आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र व वंचित कुटुंबांना निवासी जागा नियमित करून आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

