महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ॲड. कांचनकन्होजा खरात यांचे निवेदन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण, दि. ३ जुलै : महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून आणि प्रत्यक्षात घरांमधील कार्यरत वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात आहे. त्यांच्या मते, स्मार्ट मीटरबाबत देशभरातून आक्षेप नोंदविण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर अशा मोहिमेची कायदेशीरता स्पष्ट करण्यात यावी.

निवेदनात त्यांनी असा दावाही केला आहे की, स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भातील पूर्वीच्या निर्णयांमध्ये बदल झाल्यानंतर तसेच राज्य सरकारकडून सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असतानाही संबंधित अधिकारी ग्राहकांना संदेश पाठवून मीटर बसवत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

याशिवाय, राज्य सरकारच्या स्पष्ट आदेशाशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी तसेच उपलब्ध स्मार्ट मीटर सुरक्षित ठिकाणी जमा करून ठेवावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.या प्रकरणाची न्यायालयाने स्वयंसंज्ञान (सुओ मोटू) दखल घ्यावी, राज्य सरकारला आवश्यक निर्देश द्यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही ॲड. खरात यांनी केली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सौ. रेश्मा पठाण याही उपस्थित होत्या.

error: Content is protected !!