फलटणच्या विकासाला केंद्राची मोठी चालना! अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. १५ जुलै : फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि शहराला खड्डेमुक्त व चकाचक करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत मोठी बाजी मारली आहे. फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ७० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे फलटण शहरातील सर्व प्रमुख रस्ते आता उच्च दर्जाचे आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.

नवी दिल्लीत नितीन गडकरी यांची सदिच्छा घेतली भेट

आज नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत रणजितदादांनी फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा मांडत भरीव निधीची आग्रही मागणी केली.

सहा महिन्यांत कामाला सुरुवात करावी, “निंबाळकरजींनी निधी मागितल्यावर त्यांना नाही म्हणता येत नाही”

रणजितदादांच्या या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने ७० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. विशेष म्हणजे, ही मंजुरी देताना गडकरी साहेबांनी रणजितदादांच्या कार्याचा गौरव करत म्हटले की, “निंबाळकरजींनी निधी मागितल्यावर त्यांना नाही म्हणता येत नाही. त्यामुळे सदरील रस्ते तातडीने मंजूर करावेत व येणाऱ्या सहा महिन्यांत कामाला सुरुवात सुद्धा करावी,” असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

फलटणमध्ये रस्त्याकरिता कोट्यवधीचा निधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीही रणजितदादांच्या शब्दाला मान देऊन फलटण शहरासाठी निधीची अक्षरशः तिजोरी उघडली आहे.

शहरातून जाणाऱ्या अंतर्गत पालखी महामार्गासाठी यापूर्वीच सुमारे ७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नुकतेच शहरातील ‘मिसिंग मार्गासाठी’ ९७ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

आणि आज त्यात या ७० कोटींच्या निधीची भर पडली आहे. या भरघोस निधीमुळे फलटण शहरातील सर्वच्या सर्व प्रमुख रस्ते हे आता उच्च दर्जाचे आणि सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध

या ऐतिहासिक निधी मंजुरीबाबत बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.

ते म्हणाले की, “फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. आज फलटणमध्ये नगरपरिषदेपासून ते राज्यापर्यंत आणि थेट केंद्रापर्यंत भाजपचे सरकार असल्याने आपल्याला निधीची कोणतीही कमतरता भासत नाही. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला असाच भरघोस निधी मिळत आहे आणि यापुढे सुद्धा मिळत राहील.” असा ठाम विश्वास रणजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!