महानुभावांच्या दक्षिण काशीतील देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी विश्वस्तांवर कारवाईची शिफारस,सहायक धर्मादाय आयुक्तांचा निष्कर्ष

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण | प्रतिनिधी

महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र फलटण येथील श्रीकृष्ण आबासाहेब मंदिर, आबासाहेब जन्मस्थान मंदिर आणि रंगशिळा देवस्थान ट्रस्ट (नोंदणी क्र. ए-७३२/सातारा) येथील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग यांनी दिलेल्या निष्कर्ष पत्रिकेत संबंधित विश्वस्तांनी देवस्थानच्या मालमत्ता व निधीचा अपहार आणि गैरवापर करून न्यासाचे अपरिमित नुकसान केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चौकशी अर्ज क्र. ८२/२०१३ मधील अर्जदार व विरोधी पक्षकारांचे लेखी-तोंडी पुरावे, कागदपत्रे आणि साक्षींचा विचार करून हा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात नेमका किती निधीचा अपहार झाला, देवस्थानचे किती आर्थिक नुकसान झाले आणि त्याचे स्वरूप काय आहे, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ३९ अंतर्गत सविस्तर चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

निष्कर्षानुसार संबंधित विश्वस्तांनी देवस्थानची जंगम व स्थावर मालमत्ता तसेच रोख निधी स्वतःच्या मालकीप्रमाणे वापरल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून त्यामुळे देवस्थानचे आर्थिक नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित विश्वस्तांना देवस्थानच्या मालमत्तेबाबत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच देवस्थानची जंगम व स्थावर मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास मनाई करण्याचे निर्देश देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

याशिवाय देवस्थानला झालेल्या कथित नुकसानीबाबत संबंधित विश्वस्तांविरुद्ध कलम ४१-एफ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संबंधित विश्वस्तांना पदावरून दूर करण्यासाठी कलम ४१-ड अंतर्गत कार्यवाही सुरू करून, त्यादरम्यान कलम ४१-ई अंतर्गत मनाई आदेश लागू करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.देवस्थानच्या मालमत्तेवरील कब्जे, बोजे व हस्तांतरणाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविणे तसेच देवस्थान आणि त्याच्या मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचेही निष्कर्ष पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

ही निष्कर्ष पत्रिका सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग, सातारा श्रीमती एस. एस. मांजरेकर यांनी दिली आहे.या प्रकरणात अर्जदार म्हणून बाळकृष्ण दिगंबर मठपती, सुरेश सिन्नाप्पा मठपती, दिलीप गंगाधर मठपती, रमेश चंद्रकांत मठपती आणि दिलीप संपतराव मठपती यांनी चौकशी अर्ज दाखल केला होता. तर शामसुंदर दामोदर विद्वांस (शास्त्री), दगडोबा अंतोबा शिंदे, सुदामबुवा गुरु शेवंताबाई विद्वांस आणि किसन रुस्तम शिंदे यांच्याविरुद्ध ही कार्यवाही करण्यात आली. अर्जदारांची बाजू अॅड. अनिस शेख यांनी मांडली.

error: Content is protected !!